आण्णासाहेब हरी साळुंखे (जन्म : खाडेवाडी-सांगली जिल्हा,14 ऑक्टोबर , १९४३) हे मराठीतले लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. ते सातारा शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे ३१-५-२००३पर्यंत विभागप्रमुख आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे विद्याशाखेचे अधिष्ठाता (फॅकल्टी ऑफ आर्ट्सचे डीन) व ॲकॅडमिक काउन्सिलचे सदस्य होते. त्यांना राष्ट्रभाषा पंडित म्हणून गौरवण्यात आले होते.
डॉ. आ. ह. साळुंखे यांनी मराठी विश्वकोशात तुलनात्मक धर्मशास्त्र, संस्कृत इत्यादी विषयांत १००हून अधिक लेख लिहिले आहेत. १९५९ पासून जाहीर रीत्या सभांमधून भाषणे देत असले तरी त्यांची महाराष्ट्रभर भटकंती आणि व्याख्याने १९८०-८१पासून सुरू झाली. त्या सुमारास साळुंखे यांनी चार्वाकावर लिहिलेली लेखमाला वाईच्या नवभारत मासिकात प्रकाशित झाली आणि दुसऱ्या बाजूने किर्लोस्कर मासिकाच्या जून १९८१ च्या अंकात मराठा समाजावरील आत्मनिरीक्षणात्मक स्वरूपाचा गाजलेला लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून फक्त किर्लोस्करकडे तीन पोती भरतील एवढी पत्रे आली होती. तेव्हापासून आ.ह. साळुंखे यांना अखिल महाराष्ट्रातून व्याख्यानांची आमंत्रणांवर आमंत्रणे येऊ लागली.
४ ऑगस्ट २००९ला महाराष्ट्र सरकारने डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी समिती नेमली होती. या समितीत डॉ.आ. ह. साळुंखेंखेरीज वि.वि.करमरकर, प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शफाअत खान, गिरीश गांधी, डॉ.अरुण टिकेकर, अशोक नायगांवकर, आमदार उल्हास पवार, प्रा.दत्ता भगत हे सदस्य होते. समितीने तयार केलेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा २२-१-२०१० रोजी महाराष्ट्र सरकारला सादर केला. संमत झालेल्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठीही आ.ह. साळुंखे यांची नेमणूक करण्यात आली आहे.