"प्रॅक्टिकल मराठा" ही एका सामान्य मराठा तरुणाच्या विचारातून आलेली संकल्पना आहे...
एक असा तरुण ज्याचा जन्म एका गरीब मराठा शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती नसल्याने उच्च शिक्षण घेता आले नाही आणि बाल मजूर म्हणून कामाची सुरुवात करावी लागली. आईला कॅन्सर असल्याने घरातील आहे नाही ते सर्व विकून उपचार चालू होते कर्ज असल्याने वडील अगोदरच एका जमीनदाराकडे सालकरी गडी म्हणून राबत होते. असंख्य उपचार करूनही आई वाचणार नाही हे त्या तरुणाला कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टरांनी सांगितले.
एक मोठा भाऊ होता पण घरातील दारिद्र्य आणि भांडणे याला कंटाळून तो घर सोडून निघून गेला होता. मोठी बहीण होती तिचे लग्न आई जिवंत असेपर्यंत करणे गरजेचे होते कारण वडिलांचा भोळसर स्वभाव असल्याने बहिणीचे लग्न जबाबदारीने करणारे इतर कोणीही नव्हते. त्या तरुणाने सावकाराकडे जमीन गहाण ठेवून अजून कर्ज काढले आणि बहिणीचे लग्न कसेबसे करून दिले. पण अडचणींचा पाढा काही संपत नव्हता इकडे आईला कॅन्सर आणि तिकडे बहिणीचा छळ सुरू होता. अत्यंत कर्मठ अशा घरात बहिणीला तिचे नशीब घेऊन गेले होते.
पुढे असंख्य आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक समस्या अंगावर घेत या तरुणाने पुणे गाठले आणि मिळेल ते काम सुरू केले. रूम भाड्याने घेता येईल इतके पैसे जमल्यानंतर त्या तरुणाने आपल्या आजारी आईला बोलवून घेतले. तिचा कॅन्सर शेवटच्या टप्प्यात होता. तिची लघवीची पिशवी कायमच कमरेला लटकलेली. केमोथेरेपी करताना सोनोग्राफी करायचे पैसे देखील नव्हते अशी अवस्था होती. त्यातच बहिणीचा सासरी छळ होत असल्याने तिलाही आपल्याजवळ बोलावून घेतले. पुढे आई-वडिलांचे निधन झाले...
कालांतराने त्या तरुणाचे लग्न देखील झाले. कामाचा जो काही थोडाफार अनुभव होता त्या जोरावर या तरुणाने स्वतःचा उद्योग करण्याचा निर्णय घेतला. आणि कुठलीही पार्श्वभूमी आणि अनुभव नसताना "प्रेरणा इंडस्ट्रीज" नावाने इंडस्ट्रियल टर्बो व्हेंटिलेटर च्या उद्योगात पाऊल ठेवले. या दरम्यान मराठा तरुणाने बहिणीचे दुसरे लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. नातेवाईक आणि भाऊबंद वाळीत टाकण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याने आपली गावाकडील जमीन अगोदरच विकून टाकली व इंडस्ट्रियल एरिया मध्ये जागा घेतली. आज प्रेरणा इंडस्ट्रीजचा टर्नओव्हर दोनकोटीपेक्षा जास्त असून सतत वाढतो आहे. बहिणीचे नविन घरी चांगले चालले आहे, तिला हल्लीच एक कन्यारत्न प्राप्त झाले.
हा तरूण केवळ संसार-परीवाराबाबत धाडसी निर्णय घेऊन थांबला नाही तर त्याने समाजातील अंधश्रद्धा व अपप्रवृत्तीविरूद्ध देखील विवीध उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. गावाकडील शाळा, विवीध कार्यकारी संस्था ह्यांच्याशी त्याचे आजही उत्तम संबंध असून तो सातत्याने आपल्या समाजासाठी काहीतरी करत असतो. अशात कोरोना काळामध्ये बाहेर पडणे शक्य नव्हते म्हणून इंटरनेटवर कोरा मराठी या प्लॅटफॉर्मवर त्याने लिहायला सुरूवात केली. त्यातील एका प्रश्नाने त्या तरुणाचे लक्ष वेधून घेतले : मराठी माणूस सण उत्सव आणि राजकारणा व्यतिरिक्त एकत्र येऊन उद्योग करू शकतो का? या प्रश्नाला माझ्यासारख्याच अनेक मराठी धडपड्या व्यक्तींचा प्रतिसाद लाभला आणि सुरू झाला स्वप्नांचा पाठलाग!
कोरा मराठी सारख्या प्लॅटफॉर्म वरून अनोळखी मराठी लोकांनी एकत्र येऊन शेअर्स द्वारे गुंतवणूक करून आषाढी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या सामुदायिक उद्योगाची स्थापना केली. ही देशातील पहिलीच अशा प्रकारची सामुदाईक उद्योग कंपनी. 50 लाख भाग भांडवल सुमारे दीडशे च्या वर शेअर होल्डर सत्तरच्या पुढे डिस्ट्रीब्यूटर सह हा उद्योग वेगाने वाटचाल करत आहे. मराठी लोकांनी एकत्र येऊन केलेला हा चमत्कार होता.
मराठ्यांचे ५६ मूक मोर्चे झाले. आज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सकल मराठा समाज एकवटलेला आहे. पण मराठा तरुण आत्महत्या करत आहेत. त्यांच्यामध्ये नैराश्य आलेले आहे आणि आशेचा किरण दिसत नाही. कारण "व्हिजन" नाही असे मला वाटते... अशावेळी आषाढी वेंचर्स चा अनुभव पाहता "मराठा" लोकांनी एकत्र येऊन गुजरात मधील अमूल च्या धरतीवर एका विशाल उद्योगाची मुहूर्तमेढ रोवावी असे मला वाटते.
आणि याची सुरुवात मी स्वतः पासून करत आहे... म्हणूनच ह्या पोर्टलची रचना आणि ही कंपनी..
टीप : ही चळवळक्षम कंपनी आहे पण सामाजीक संस्था नाही आणि कुठल्याही राजकीय पुढारी वा पक्षांसोबत काम करणार नाही. जोवर पूर्णपणे आर्थिक सक्षमता येत नाही तोवर कुठल्याही सामाजिक लढ्यांवर काम करणार नाही. ही चळवळ पूर्णपणे उद्योग केंद्रित असेल. पण शेअरमार्केट, नेटवर्क मार्केटींग सारखी पटकन श्रीमंत व्हायची स्किम नाही आणि अशा कुठल्याही स्किममधे गुंतवणूक करणार नाही.