समाज जीवनामध्ये बदल व्हावा म्हणून आपण "सरकार" आणि "प्रस्थापित" आहेत त्यांच्याकडेच अपेेक्षेने पाहत असतो. ते स्वाभाविकच आहे म्हणा. "सरकार" तर ह्यासाठीच आपण निवडून देतो आणि प्रस्थापितांकडे पुरेसा वेळ आणि अनुभव असतो बदल घडवण्यासाठी. त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजाला होईल अशी आपल्याला भाबडी आशा असते. आपण एकतर अपेक्षा करत राहतो नाहीतर नशीबाला दोष बसतो. पण इतिहास साक्ष आहे की समाजात परिवर्तन हे कधीच प्रस्थापितांकडून आणि नेत्यांकडून घडले नाही!
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अशा प्रसंगात कायमच मार्गदर्शक ठरले आहे. व्यंकोजी महाराजांनी राजधर्माचा आणि कर्माचा त्याग करून जेव्हा वैराग्य धारण केले तेव्हा महाराजांनी त्यांना खरमरीत पत्र लिहून जाब विचारला की, "... कार्यप्रयोजनाचा उद्योग सोडून लोकाहाती रिकामेपणी द्रव्य खाऊन नाश करवणे व आपल्या शरीराची उपेक्षा करणे हे कोण शहाणपण व कोणती निती? ... जमेती सेवक लोकांना रिकामे न ठेवून कार्यप्रयोजनाचा उद्योग करून त्यापासून सेवा करून पुरूषार्थ व किर्ती अर्जणे. तुम्ही त्याप्रते पुरूषार्थ करून संतोषरूप असलीया आम्हास समाधान व श्लाघ्य आहे!" .. महाराजांचे हे पत्र आणि त्यांचे एकूणच जीवन नेहमीच प्रेरणा देत आलेले आहे.
केवळ प्रस्थापितांकडून आणि नेत्यांकडून अपेक्षा करत बसण्यापेक्षा, "विस्थापित पण प्रॅक्टिकल" असणाऱ्या आपण सर्वांनी एकत्र येऊन काहितरी सुरुवात केली पाहिजे असे असे मला वाटते. समाजाचा सार्वत्रिक विकास हा विषय लक्षात घेता "सहकार क्षेत्र", "लिज्जत पापड" आणि "अमूल उद्योग समूह" सारखे प्रयोग खूप आश्वासक वाटतात. रिलायंस उद्योग समूहाचा "मालक" कोण किंवा प्रमुख लाभार्थी कोण हे आपणा सर्वांनाच पटकन सांगता येते. पण लिज्जत किंवा अमूलचा मुख्य लाभार्थी कोण सांगा बरे?
कोरोना काळात जेव्हा नैराश्याने वेढले होते आणि आशेचा काही किरणच दिसत नव्हता तेव्हा सोशल मीडियावरील माझ्यासारख्या काही तरूणांनी एकत्र येऊन "मराठी लोकांनी व्यवसाईकतेकडे वळावे ह्यासाठी" "आषाढी व्हेंचर्स" या नावाने भारतातील पहिली आणि एकमेव "सामुदायिक कंपनी" चालू केली. नारळ प्रक्रीया आणि मूल्यवर्धन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संधींचा वेध घेत "नारळाच्या दुधाचे तेल" म्हणजेच "व्हर्जीन कोकोनट ऑईल" ह्या उत्पादनावर दोन वर्षे कसोशीने, प्रामाणिकपणे मेहनत करून "अक्षत व्हिसीओ" नावाचा ब्रँड तयार केला, त्याबद्दल जागृती केली आणि १०००० हून अधिक उत्पादने विकली. आषाढीचे आता महाराष्ट्रभर ८० हून अधिक डिस्ट्रीब्युटर आहेत व सातत्याने वाढत आहेत. हे सारे करत असताना ह्याचा प्रत्येक लाभार्थी हा मराठीच असला पाहिजे हा आमचा कटाक्ष होता.
अशाच प्रकारे एक एक पाऊल माणूस जोडत आषाढीची एक उ"द्यमशिलतेची वारी" बनेल. आम्ही विविध प्रोजेक्टला हात घालतच आहोत. भविष्यात जेव्हा ही कंपनी शंभर कोटींची असेल तेव्हा केवळ पैसाच नाही तर एक प्रभाव देखील तयार झालेला असेल जो बदल घडवण्यासाठी आग्रही असेल.
आषाढी व्हेंचर्सचे मूल्यांकन काही कोटींचे असून अनेक गुंतवणूकदार ह्या कंपनीमधे मोठ्या आर्थिक गुंतवणूकीसाठी आग्रही आहेत. हे करायला फक्त २ गोष्टी लागल्या - चांगल्या ध्येयाने पछाडलेल्या लोकांचे संघटन आणि सातत्य!
आषाढी ही केवळ कल्पना म्हणून मांडली तेव्हापासून मी ह्या वारीचा साक्षी आहे. आणि गेल्या दोन-तीन वर्षांचा अनुभव पाहता मला खात्री वाटते की हेच काम मराठा समाजासाठी उभे करू शकतो आणि अशा प्रकारचे कामच मराठा समाजातील क्रांतीकारक बदलांसाठी कारण ठरेल. आपण कुठला व्यवसाय करतो किंवा कुठले उत्पादन विकतो ह्याला फारसे महत्व नाही. केवळ एक "प्रॅक्टीकल" कर्म सातत्याने चालू असायला हवे. अमूल सारख्या मोठ्या समूहाची सुरुवात अशीच छोट्याशा जागेतून पण "निश्चयपूर्वक विचारातून" झाली. आज हा उद्योग समूह राजकारण, अर्थकारण, शेती, शिक्षणापर्यंत प्रभाव टाकून आहे. तोच प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत देखील जाणवतो. केवळ संध्याकाळी शाखा ह्या कार्यक्रमातून त्यांनी देशात एक पंतप्रधान दिला. ह्यातून कर्म आणि सातत्याचे महत्व अधोरेखीत होते.
दुसरा तितकाच महत्वाचा विषय म्हणजे आपल्या समाजातील कर्तुत्वान आणि प्रभावशाली लोकांची "माहिती" कुठेही सहजासहजी उपलब्ध होत नाही. कुठलाही प्लॅटफॉर्मवर असे संकलन नाही. मराठी कर्तृत्वाची पुरेशी नोंद नाही. मराठा समाजाचे कर्तृत्व आजही इतिहासात छत्रपतीं आणि संभाजीमहाराजांपुरतेच मर्यादीत आहे. अगदी आजच्या काळातील उदाहरण म्हणजे विखे पाटील ज्यानी महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची यशस्वी मुहूर्तमेढ रोवली तर शरद पवारांनी कृषी क्षेत्रात क्रांतीकारक निर्णय राबवले. असेच अनेक मराठा नेते, अधिकारी, गुणी कलाकार आहेतच पण त्यांच्याबाबत पुरेसे साहित्य उपलब्ध होत नाही. कारण मुख्यत्वे पुस्तके/लेखन आणि नाटक-सिनेमा सारख्या प्रतिभावान क्षेत्रात "मराठा समाज" म्हणून आपला प्रभाव नाही.
हे कर्तुत्व जर पुढच्या पिढीत झिरपलेच नाही तर पुढच्या पिढीला प्रेरणा कुठून मिळणार. आपण पिढ्यानपिढ्या फक्त नोकरी मागत फिरणार आहोत का? त्यासाठी आपण लिहीते होणे आवश्यक आहे. आपल्या समाजाबाबत आणि समाजातील कर्तृत्ववान समाजबांधवांबाबत आपण लिहायला पाहिजे, शेअर करायला पाहिजे. ह्यासाठी मी मराठा समाजासाठी स्वतंत्र आणि डायनॅमिक वेबसाईट तयार करून घेतो आहे. बहुतेक वेळेस आपल्या संघटनांच्या स्टॅटीक वेवसाईट्स बनवल्या जातात आणि त्यावर एकच माहिती/फोटो वर्षानुवर्षे तसेच असतात. अनेक वेळेस तर माहिती PDF स्वरूपात असते आणि त्याचा काही उपयोग होत नाही. पण आपण बनवत असलेले वेबपोर्टल हे द्रुपाल नावाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवत आहे जे वापरून नासा/व्हाईट हाऊस, NIC सारखी पोर्टल बनवली जातात. ह्या पोर्टलवर केवळ ऐतिहासीक माहिती न ठेवता आपण त्या ठिकाणी समाजोपयोगी असे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ब्लॉगींग, डिरेक्टरी, मॅट्रीमोनी, टॅलेंट सर्च, जॉब बोर्ड असे अनेक आणि सातत्याने अपडेट होणारे सेक्शन ठेवले आहेत. इथे रजिस्टर झाल्याने तुम्ही देखील ह्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन इतिहास राजकारण कला क्रीडा प्रथा परंपरा या सर्व विषयांवर लिखाण करू शकता. शिवाय उद्योग नोकरी व्यवसाय लग्न सारख्या आपल्या दैनंदीन जीवनावश्यक गोष्टींना देखील साकारू शकतो.
अशा विवीधांगी उपक्रमातून मला मराठा समाजामधे प्रॅक्टीकल बदल घडवायचा आहे. जर तुम्हाला हे योग्य वाटत असेल तर तुम्ही देखील ह्यात सामील होऊ शकता. जर मी चुकत असेन तर नक्की सांगा, मी त्यात सुधारणा करेन!