महाराणी ताराबाई (१६७५ - १७६१) या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८७ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम जिंजीला गेल्यानंतर महाराणी ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी महाराणी ताराबाईंना शिवाजी (दुसरा) हा पुत्र झाला.
राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेउन ताराबाईंनी मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून शत्रू थोपवून धरला. त्या स्वतः लष्करापुढे येउन लष्कराचा आत्मविश्वास वाढवित. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले.
ताराबाईंनी करवीर राज्याची म्हणजे कोल्हापूरच्या राजगादीची त्यांनी स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांच्यामागे त्यांनी समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन त्यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले.
दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलयाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "
असे तत्कालीन कवि गोविंद यांनी ताराबाईचे वर्णन केले आहे.
ताराबाई औरंगजेबाच्या प्रचंड मुघल सैन्याविरुद्ध उभ्या ठाकल्या असताना केवळ २४ ते २५ वर्षांच्या होत्या. त्यांनी औरंगजेबासारख्या मुत्सदी, नृशंस व कपटी सम्राटाशी सलग साडेसात वर्षे लढा दिला.